सनी देओलसाठी गेले वर्ष विशेष काही खास घडलेले नाही. त्याचे काही सिनेमे फ्लॉप झाले आहेत. सनीचा मुलगा करण देओललाही “पल पल दिल के पास’मधून सिनेसृष्टीत उतरवले. पण हा सिनेमाही फारसा चालला नव्हता. करण देओलचा धाकटा भाऊ राजवीर आणि चुलत भाऊ (बॉबी देओलचा मुलगा) आर्यमान हे देखील आता लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहेत.
ऍक्टिंगचे प्रशिक्षण या दोघांनीही सुरू केले आहे. याच सुमारास सनीने राजकारणाचा अध्याय सुरू केला आणि सिनेमापासून तो थोडा दूरच रहायला लागला आहे. मात्र आता तो लवकरच “कमबॅक’ करणार आहे. “जी-49’या त्याच्या आगामी वेबसिरीजचे शूटिंग सुरू झाले आहे. डिजीटल वर्ल्डची वाढती लोकप्रियता बघून सनीने आता डिजीटल विश्वात उतरायचे ठरवले आहे.
“जी-49’ही वेबसिरीज सनीच्या इमेजला साजेशी ऍक्शन पॅक्ड असणार आहे. या वेबसिरीजचे डिटेल्स अजून उजेडात आलेले नाहीत. सनीने या वेबसिरीजमध्ये अर्थातच एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची नाही, तर एखाद्या आर्मी ऑफिसरची भूमिका केलेली असू शकते. कारण प्रेक्षकांना त्याला याच रोलमध्ये बघण्याची सवय झालेली आहे.