नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 342 एसटी चालकांवर कारवाई
पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 342 एसटी चालकांवर विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली. महामार्ग पोलीस पळस्पे केंद्र आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. एसटी चालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई केली आहे. यामध्ये फोनवर बोलणे, महामार्गावर लेनची शिस्त न पाळणे आदींचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्ग अपघातांचे केंद्र बनले आहे. महामार्गावर चालणारी अवजड वाहने, खासगी बस, एसटी चालक डाव्या मार्गिकेतून न जाता उजव्या मार्गिकेतून चालतात. त्यामुळे छोटी वाहने ओव्हरटेक करताना डाव्या बाजूने जातात. या दरम्यान, अनेक अपघात झाल्याचे दिसून आले आहे. अवजड वाहने नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले आहेत. या चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आतापर्यंत 2 लाख माहिती पत्रके वाटली असूनही बस आणि अवजड वाहने शिस्तभंग करताना दिसतात. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार एक्स्प्रेसवेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
विशेष मोहीम राबवून महामार्गावर लेन कटिंग, मोबाइलवर बोलणे, अतिवेगाने गाडी चालविणे या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली. यात एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाई, विठाई, हिरकणी आणि इतर बसेसचा समावेश आहे. महामार्गावर अवजड वाहनचालक व बसचालकांनी मार्गिकेचे नियम पाळल्यास अपघात कमी होतील, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.