सातारा – साताऱ्याचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मकरंद जोशी यांचा मुलगा मिहीर हा सीए फाउंडेशन परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकला आहे. या परीक्षेत मिहीरने 400 पैकी 339 गुण मिळवून संपूर्ण देशात 25 वा क्रमांक पटकावला आहे.
सीए फाउंडेशन परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात मिहीर मकरंद जोशीने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्याच्या यशाचे वृत्त समजताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. मिहीर हा प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मकरंद जोशी यांचा चिरंजीव असून गुरूकुल शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मिहीरने महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात पूर्ण केले.
सीए फाउंडेशनच्या तयारीसाठी मिहीरने पुणे येथे खासगी संस्थेत प्रवेश घेतला होता. मिहीरने इयत्ता दहावीत 99.40 टक्के व बारावीत 96 टक्के गुण मिळवले होते. गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारा मिहीर हा जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे मिहीर हा उत्कृष्ट बुद्धिबळपटू आहे. कसून सराव, मांडणीतील अचूकता यावर लक्ष ठेऊन अभ्यास केला. आई मंजिरी व वडील मकरंद यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया दिल्याचे मिहीरने “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली. गुरूकुल शिक्षण संस्थेचे प्रमुख राजेंद्र चोरगे यांनी मिहीरचे अभिनंदन केले.