दक्षिण अमेरिकेतील गयाना देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगप्रसिद्ध मॅश किंवा मश्रामनी कार्निव्हल फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. दको-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयाना असे या देशाचे अधिकृत नाव आहे. गयाना देशात 63 टक्के ख्रिश्चन, 24.8 टक्के हिंदू, 7 टक्के मुस्लीम आणि इतर लोक आहेत. गयाना देशाला 1970 मध्ये प्रजासत्ताक म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर दरवर्षी मॅश कार्निव्हल साजरा केला जातो. मॅश कार्निव्हलमध्ये परेड, संगीत, खेळ, नाचगाणी असा समावेश आहे. मॅश कार्निव्हलमध्ये नेत्रदीपक पोशाख स्पर्धा, फ्लोट परेड, मास्क रेड बॅंड आणि स्टील बॅंड संगीत आणि कॅलिप्सोजच्या साथीने रस्त्यावर नाच पाहायला मिळतो.
हा देश 1966 साली स्वतंत्र झाला. फेब्रुवारी 1970 मध्ये गयाना प्रजासत्ताक बनल्यानंतर मॅश कार्निव्हल सुरू झाला. नंतर या कार्निव्हलला जगभरातील लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला. मॅश कार्निव्हलमधील नृत्य, परेड आणि संगीत पाहण्यासाठी लोक गयाना देशातील जॉर्ज टाऊन येथे दरवर्षी येतात.
गयाना देशात मॅश कार्निव्हल तीन दिवस साजरा केला जातो. कार्निव्हल पाहण्यासाठी व गयाना संस्कृती अनुभवण्यासाठी जगभरातील लोक मैलोन्मैल रस्त्यावरून चालत सर्व मनोरंजक कार्यक्रमात भाग घेतात, कार्यक्रमाचा आनंद लुटतात. मॅश किंवा मश्रामनी कार्निव्हलच्या आदल्या रात्री ज्युवर्ट कार्यक्रम घेतला जातो. या उत्सवात कॅलिप्सो/सॉका बॅंड आणि त्यांचे अनुयायी रस्त्यावरून नृत्य करतात. पहाट होण्यापूर्वी उत्सव रंगात येतो आणि सूर्योदयाच्या काही तासांनंतर उत्सवाचा समारोप होतो. नंतर अन्य कार्यक्रम दोन दिवस घेतले जातात. मॅश कार्निव्हल हा गयाना संस्कृतीतील लोकसंगीताला प्रतिष्ठा निर्माण करून देणारा उत्सव आहे. या कार्निव्हलमध्ये विविध शैली, शैली आणि संगीतातील अभिव्यक्ती यांचे मिश्रण याचे दर्शन होते. मॅश /मश्रामनी कार्निव्हल किंवा फेस्टिव्हल हा ब्राझील, त्रिनिदाद, जमैका, बार्बाडोस आणि इतर ठिकाणांपेक्षा रोमांचकारी आणि उत्साही सांस्कृतिक उत्सव आहे.
मॅश कार्निव्हलमध्ये पोशाख स्पर्धा, फ्लोट परेड, रस्त्यावर नाचणे, स्टीलचे ड्रम, कॅलिप्सो, सॉका, डान्स हॉल आणि इतर अनेक प्रकारातील संगीताचा समावेश असतो. परेड नंतर स्पर्धेतील सर्वोत्तम फ्लोट, सर्वोत्कृष्ट थीम, सर्वोत्कृष्ट पोशाख आणि इतर विजेत्यांना मुकुट परिधान केला जातो, आकर्षक बक्षिसे दिली जातात. गयाना मंत्रालयांतर्गत, मश्रामनी फेस्टिव्हलमध्ये प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कार्यक्रम आयोजित केले जातात.
गयाना नॅशनल म्युझियममध्ये मॅश कार्निव्हलमधील कलाकृती जतन केल्या गेल्या आहेत. मॅश कार्निव्हलचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील अनेक अभ्यासक येथे येत असतात. त्यामुळे मॅश कार्निव्हल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. मॅश कार्निव्हल 23 फेब्रुवारी 2020ला सुरू होत आहे.
– अशोक सुतार