विशेष : करोना व्हायरस : भीती आणि दक्षता

सध्या चीनमध्ये करोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याची धग संपूर्ण जगाला लागत आहे. अर्ध्या जगात करोना रोगाचे रुग्ण आढळले आहेत. या आधीही स्वाईन फ्लूसारख्या व्हायरसने जगाला नाचवले आहेच. तरी जग विषाणूंबाबत काळजी का घेत नाही?

करोना विषाणू म्हणजे काय?
रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा करोना व्हायरस असल्याचं सांगितलं. करोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या करोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. या नव्या करोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्‍लेषण करण्यात आलं. करोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्‍लेषणात आढळलं आहे.

करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील प्रतिबंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. चीननं आपल्या नागरिकांना परदेश यात्रा न करण्याची सूचना केली आहे. अमेरिकेनंही आपल्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याची सूचना केली आहे. ज्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामधून या व्हायरसला सुरुवात झाली, तिथे अजूनही सर्व व्यवहार ठप्प असून अनेक शहरांनी दळणवळण बंद ठेवलेलं आहे. करोना व्हायरसमुळे श्‍वसन यंत्रणेला गंभीर संसर्ग होतो. यावर कोणतंही औषध वा लस उपलब्ध नाही. करोना विषाणूचे जंतू एखाद्या व्यक्‍तीच्या शरीरात शिरल्यापासून त्याची लक्षणं दिसू लागण्यादरम्यानच्या काळातही याचा संसर्ग इतरांना होऊ शकत असल्याचं चिनी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. यामुळेच हा रोग पसरणं आटोक्‍यात आणणं कठीण जातंय. जंतू संसर्ग झाल्यापासून त्याची लक्षणं दिसेपर्यंत जास्तीत जास्त 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. यादरम्यान एखाद्या व्यक्‍तीला हा संसर्ग झाल्याचं समजू शकत नाही.

करोनाची लक्षणे
डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज अशी लक्षणे जाणवतात.

करोना विषाणू गंभीर आहे का?
करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढवू शकतो. सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.

करोना विषाणू आला कुठून?
हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्‍यता आहे. सार्स हा विषाणू मांजरातून माणसात आला होता. मात्र, करोना विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही. लोकसंख्येचे प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीममधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात.

कशी घ्याल दक्षता?
चीनमध्ये करोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळावा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत, असं नाही. चीनव्यतिरिक्‍त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. करोना विषाणूच्या स्रोताची माहिती मिळत नाही तोवर अडचणी कायम राहणार आहेत.

मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं. अभ्यासात असं आढळून आलं आहे की जेव्हा लोक मास्कचा दीर्घकाळापासून उपयोग करत असतात तेव्हा मास्क घालताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्याचा सहसा विसर पडतो. मास्क घालण्यापेक्षा शारीरिक आणि हाताच्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगी बाळगायला हव्या, कुठल्याही विषाणूची साथ आली की हमखास दिसणारं चित्रं म्हणजे तोंडावर मास्क लावलेली माणसं. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत.

यापुढे कोणताही व्हायरस किंवा कुठलाही संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी संपूर्ण जगाने स्वच्छ राहणे गरजेचे आहे. केवळ स्वच्छ राहणेच नाही तर स्वच्छतेची मानसिकता अंगिकारून ती उत्तरोत्तर वाढवावीच लागेल. तरच अशा जीवघेण्या संसर्गापासून देश आणि जगाला आपण वाचवू शकतो.

– जगदिश देशमुख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.