पक्षाच्या झेंड्याचाही मान राखा
मुंबई : हिंदुहृदयसम्राट हा मान केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे मला हिंदहृदयसम्राट म्हणू नका. इतकेच नव्हेत तर पक्षाच्या झेंड्याचाही मान राखा. कारण, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिल्या.
एनआरसी व सीएएच्या समर्थनासाठी मनसेच्यावतीने 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे सोमवारी सकाळी ही बैठक झाली. यावेळी राज यांनी मनसे नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्या. मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट संबोधायला सुरूवात केली आहे. तसे बॅनर्स देखील लागले होते. याच पाश्वभूमीवर राज ठाकरे यांनी मला हिंदुहृदयसम्राट बोलू नका, तो मान केवळ बाळासाहेबांचाच आहे, असे पदाधिकाऱ्यांना बजावले.
मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांविरोधात वळवला आहे. यासाठीच एनआरसी कायद्याला विरोध करणाछयांविरोधात मनसे विराट मोर्चा काढणार आहे. महाअधिवेशनादरम्यान एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांचा नामोल्लेख करत देशप्रेमी मुस्लीम आपलेच असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, हा मोर्चा नेमका कुठून काढणार हे मनसेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
10 मिनिटांची उपस्थिती
राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची रंगशारदा येथे बैठक बोलावली होती. त्यात फक्त 10 मिनिटांची उपस्थिती लावून राज ठाकरे बाहेर पडले. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते जास्त काळ या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत असे समजते. त्यामुळे बैठकीतील मार्गदर्शनाची जबाबदारी राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर सोपोवली होती.