सातारा – जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनुसूचित जमाती संवर्गातील गट क आणि गट ड मधील 69 जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवारी साताऱ्यातील बारा केंद्रांवर दोन सत्रांत झाली. नऊ हजार 841 उमेदवारांपैकी सात हजार 541 उमेदवार या परीक्षेस बसले. दोन हजार 271 उमेदवार या परीक्षेस गैरहजर होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.
औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, परिचर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली. औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कंत्राटी ग्रामसेवक यांच्या लेखी परीक्षेसाठी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत अनंत इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, महाराजा सजायीराव विद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल याठिकाणी 88 खोल्यांमध्ये तीन हजार 23 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या परीक्षेस दोन हजार 339 उमेदवार हजर होते. 684 उमेदवार या परीक्षेस गैरहजर होते.
दुपारच्या सत्रात परिचर पदासाठी साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, छत्रपती शिवाजी कॉलेज, धनंजयराव गाडगीळ कॉलेज, लाल बहाद्दूर शास्त्री कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, भवानी विद्यालय, श्रीपतराव पाटील विद्यालय या 12 केंद्रांवरील 285 खोल्यांमध्ये सहा हजार 818 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात या परीक्षेस पाच हजार 231 उमेदवार हजर होते. एक हजार 587 उमेदवार गैरहजर होते.
भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. या परीक्षेस सातारा जिल्हातीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार साताऱ्यात आले होते. परीक्षेच्या योग्य नियोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह झोनल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.