चार कर्मचारी जखमी
कराड – येथील मार्केट यार्ड गेट क्रमांक तीनच्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नव्याने बनवण्यात येणाऱ्या स्वागत कमानीचा स्लॅब कोसळला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमानीचे बांधकाम सुरु असून ते काम अंतिम टप्प्यात आले होते. मात्र बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या कमानीचा स्लॅब अचानकपणे कोसळला. यामध्ये सुमारे चार कर्मचारी जखमी झाली आहे. बाजार समिती प्रवेशद्वाराच्या कमान उभारणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, कमान उभारणीचे काम सुरु असतानाच तो कोसळल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या र्दुघटनेत जखमी झालेल्या बांधकाम मजुरांच्या कुटुंबियांकडून सदर कामाच्या ठेकेदाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. कमान कोसळल्यावर कमानीसाठी टाकलेला स्लॅब हा रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे बाजार समिती ते जुने तहसील कार्यालय हा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील कोसळलेला स्लॅब बाजूला करुन रस्ता पूर्ववत करण्यात आला.