नगर – डिस्ट्रिक्ट प्रोबेशन ऍण्ड आफ्टर केअर असोसिएशन अहमदनगर हा सार्वजनिक ट्रस्ट मुला मुलींचे बालगृह, मुला मुलींचे निरीक्षणगृह, अनाथ बालकांचे शिशुगृह, संगोपन व दत्तक केंद्र निराधार बालकाश्रम चालवतो. नगरमधील हा जुना ट्रस्ट असून संस्थेत बाल न्यायालय चाईल्ड वेलफेअर कमिटीमार्फत बालके दाखल होतात.
संस्थेच्या शिशुगृह विभागात नवजात बालक ते सहा वर्षांपर्यंत अनाथ तसेच त्याग केलेल्या बालकांचे संगोपन होते व मे जिल्हा न्यायालयाचे परवानगीनुसार बालकांचे दत्तक विधान होते त्यासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशातील पालक येतात व मुल दत्तक घेतात. आतापर्यंत सुमारे 150 हून अधिक अनाथ बालके देश विदेशात संस्थेमार्फत दत्तक देण्यात आली आहेत. संस्थेस आंतरदेशीय व परदेशी दत्तक विधान करण्याचा परवाना मिळाला आहे.
इटलीतील रहिवासी पालक पती पत्नी मि. कासुला जीओवन्नी व मिसेस मेलीस टिझियाना यांनी संस्थेच्या शिशुगृहात बालकाची साई रुद्र व त्रिश या भावंडांना में कोर्ट आदेशानुसार दत्तक घेतले व संस्थेने दत्तक मुले त्यांचे ताब्यात दिली. याप्रसंगी नवी दिल्ली येथील दत्तक प्रक्रियेचे संस्थेचे कोऑर्डिनेटर हसमुख ठक्कर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे मानद सचिव ऍड. जी.आर. मिरीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली. संस्थेच्या बालकांनी स्वागत गीत गायले. इटलीतील पालकांचा संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.अच्युत चौधरी यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार केला. पाच सुवासिनींनी पाहुणे व दत्तक बालकांना औक्षण केले. साईरुद्र व त्रिश संस्थेत दाखल झाल्यावर त्यांच्या मायेने सांभाळ केला म्हणून शिशु गृहातील आया छाया रंधवे, द्वारका कदम, शिल्पा नराल मीरा रोहकले, पुष्पा गाढवे यांचा सत्कार मिसेस मेलीस यांच्या हस्ते करण्यात आला.
विशेष परिश्रम घेतल्याबद्दल शिशुगृहाच्या मॅनेजर मेधा देशमुख व परिचारिका अरुणा कुमठेकर यांचाही सत्कार पाहुणे पालकांनी केला. कार्यक्रमास जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती विजयमाला माने, बालसुरक्षा अधिकारी श्री देशमुख, संस्थेचे खजिनदार ऍड. व्हि.डी.आठरे, सचिव ऍड. जयवंत भापकर, विश्वस्त विनिता गुणे व संस्थेचे कर्मचारी व बालक व बालिका उपस्थित होत्या.