महेंद्र गंधे यांची माहिती; भाजपा कार्यालयात जाऊन स्वीकारली सूत्रे
नगर – भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष आपल्या दारीफ हा उपक्रम लवकरच सुरू करणार असल्याची माहिती भाजपाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैया गंधे यांनी दिली.
भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बुधवारी (दि.22) गंधे यांनी शहर भाजपा कार्यालयात जावून पक्षाची सूत्रे हाती घेत कामकाजास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांचे कार्यालयात संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, भाजपाचे मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे, सावेडी मंडल अध्यक्ष सतिश शिंदे, चेतन जग्गी, मनोज ताठे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गंधे म्हणाले, केंद्रात भारतीय पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात विविध समाजोपयोगी योजना राबवित आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे.
ही जबाबदारी असल्याने या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष आपल्या दारीफ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या विकासाच्या कामासाठी पक्षीय राजकारण आणणार नाही. शहर विकसित व्हावे यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करुन कामे करणार आहे. भाजपात कुठलेही गट-तट नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, शहरात पक्षवाढीसाठी सर्वजण एकजुटीने काम करणार असून सर्वांच्या सहकार्याने विविध विकासकामे शहरात राबवणार आहोत. शहर विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.