मुंबई : राज्याचा महसूल वाढवण्याबरोबरच महसूल चोरीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने महत्वाचे पाऊल टाकले आहे. ऑनलाईन लॉटरीमुळे होणारी महसूलचोरी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पेपर लॉटरी मात्र कायम सुरु ठेवण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विकास योजना आणि पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर अर्थमंत्री म्हणून या नात्याने अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले असून विविध विभागांचा महसूलवाढीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात येत आहे. महसुलवाढ करताना प्रामुख्याने महसूलचोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यादृष्टीने राज्यात ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालून केवळ पेपर लॉटरी सुरु कायम ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारच्यावतीने राज्यात अनेक विकासयोजना आणि पायाभूत प्रकल्पांची कामे सुरु आहेत. अशा कामांमधील व्यवहारात होणाऱ्या भ्रष्टाचाराला चाप लावण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारशी संबंधीत आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे पॅन क्रमांक अनिवार्य असणार आहे. महसुलचोरीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
हॉटेलमधील मद्यविक्रीवरील कर रद्द करणार
हॉटेलमध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यावर दोन प्रकारचे कर आकारले जातात. त्यामुळे हॉटेलमधून विक्री होणाऱ्या मद्यावरील कर रद्द करण्यात येणार असून मद्यनिर्मितीवरचा सरसकट कर वाढवण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या महसुलात वाढ अपेक्षित आहे.