नवी पिढी जुगाराच्या विळख्यात सापडणार; महिला वर्गात चिंतेचे वातावरण
शिराळा – शिराळा शहरात बंद झालेला मटका पुन्हा ओपन झाला आहे. तब्बल 18 वर्षानंतर मटकाबुकींनी आपले डोकं वर काढल्याने नवीन पिढी पुन्हा जुगाराच्या विळख्यात सापडणार असल्याने ग्रामस्थांमध्ये व विशेषत: महिला वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करून मटका बंद करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
शिराळा शहरासह तालुक्यात काही मटका बहादुरांनी पंटर नेमून आपले मटकाबुकीचे बस्तान पुन्हा बसवण्यास सुरवात केली आहे. शिराळा तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील लोकांना शेती शिवाय पर्याय नाही. परंतु जास्त करून या तालुक्यातील शेती ही कोरडवाहूच आहे. त्यामुळे शेतीतून अतिशय तुटपुंजे उत्पन्न मिळते.
पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने या तालुक्यातील अनेक लोक आपल्यासह आपल्या कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ती मोलमजुरी करण्यासाठी पुणे-मुंबईकडे धावत आहेत. मात्र इकडचा तरूण वर्ग जुगाराच्या गडाऱ्यात अडकला आहे. जवळपास अठरा ते वीस वर्षापूर्वी सांगली जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांनी सांगली जिल्ह्यात हातभट्टीची गावटी अवैध दारु व जुगार अड्यांवर धडक कारवाई केली होती.
तेव्हा मटकाबुकींचे धाबे दणाणले होते. गेल्या अठरा वर्षात कोठेही जुगाराचे अड्डे दिसत नव्हते. पुन्हा शिराळा शहरासह तालुक्यातील अनेक गावात क्लोज मटका ओपन असे कानावर पडत आहे. विशेषतः शिराळा, मांगले, सागाव आदी गावात सध्या मटक्याने पुन्हा डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन वेळीच अशा अपप्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे.