गतवर्षी 21 हजार 347 रक्त पिशव्यांचे संकलन : जनजागृतीचा परिणाम
पुणे – गोरगरीब आणि सर्वसामान्यांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या ससून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्याकडून नागरिकांना नेहमीच रक्तदान आणि अवयवदानाबाबत समुपदेशन आणि जागृती केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी रक्तदात्यांची संख्या वाढत असून 2019 मध्ये ससून रुग्णालयाने विविध शिबिरे आणि जनजागृतीच्या माध्यमातून 21 हजार 347 रक्तपिशव्यांचे संकलन केले आहे. त्याचा फायदा शहरासह राज्यातील विविध 47 हजार 318 रुग्णांना झाला असल्याची माहिती ससून रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
या रक्तपेढीतून गरजू रुग्णांना मोफत रक्तपिशवी दिली जाते. दरवर्षी रक्तदानाची संख्या वाढावी यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह कर्मचारी वर्गाकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. विविध जयंती, पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, वाढदिवस, प्रजासत्ताक दिवस यासह शाळा, महाविद्यालयात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रुग्णालयाकडून रक्तसंकलन केले जाते. मागील पाच वर्षांतील या रक्तसंकलनाची आकडेवारी पाहिली तर यावर्षीही रक्तसंकलनाचा आकडा 21 हजारांपर्यंत केला आहे. रक्तपिशव्यांची वाढ झाली असून त्यांचा फायदा गरजू रुग्णांना होत आहे.
संस्थांचाही पुढाकार
या रक्तसंकलनासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, रॉबीन हुड आर्मी, सी.ओ.ई.पी. पुणे, व्ही.आय.टी. कॉलेज, बालाजी युनिव्हर्सिटी आणि भारत फोर्ज इत्यादी सेवाभावी संस्थांनी रक्तपेढीसाठी रक्तदान केले आहे. ससून रक्तपेढीचे विभागप्रमुख डॉ. लीना नकाते, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी व रक्तपेढी विभागातील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.
ज्या समाजात आपण राहतो, त्याचे ऋण फेडायची रक्तदान ही एक मोलाची संधी असते. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे. तसेच वाढदिवसानिमित्त आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला रक्तदानासाठी प्रवृत्त करावे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता ससून रुग्णालय