महापौर उषा ढोरे यांचा सूचक इशारा
पिंपरी – महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय तहकुब केल्यानंतर त्यावर चर्चा करून काहीच फायदा नव्हता. सर्वसाधारण सभेत मानदंड पळविण्याचा झालेला प्रयत्न आणि याप्रसंगी विरोधकांनी केलेला गोंधळ चुकीचा होता. सभेची शिस्त मोडण्याचा हा प्रकार एकदा सहन केला. सारखा सहन करणार नाही. मला महापौर पदाच्या खुर्चीचे अधिकार वापरण्यास लावू नका, असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी सोमवारी दिला.
खासगी वाटाघाटीने भूसंपादन करताना तीनशे चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडाचे विभाजन करून तुकडा 300 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचा भूखंड केलेल्या सर्व प्रकरणात सांत्वना रक्कम 30 टक्के इतकीच देय राहील, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर आज मंजुरीसाठी होता. हा प्रस्ताव महापौरांनी तहकूब केल्यानंतर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी या विषयावर चर्चा व्हायला हवी, अशी भूमिका घेतली. तसेच, मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. तसेच, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला.
सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्याबाबत पत्रकारांशी बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, संबंधित विषयाबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे. त्याबाबत सर्वांना माहिती दिली जाईल. या विषयाची व्यवस्थित माहिती मिळत नाही तोपर्यंत विषय तहकूब केला आहे. विषय तहकूब केल्यावर त्यावर चर्चा करून फायदा नव्हता. विरोधकांनी अशा पद्धतीने चुकीचा गोंधळ करू नये.