विविध संघटनांचा निर्धार; शासकीय कार्यालयांसमोर उद्या निदर्शने
सातारा – दहा केंद्रीय कामगार संघटना, बॅंक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी (दि. 8) देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून सातारा जिल्ह्यात हा संप यशस्वी होईल, असा निर्धार विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
बुधवारी कर्मचाऱ्यांच्यावतीने आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून याठिकाणी सभाही होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बेरोजगारी, नोकरभरती, कंत्राटी कर्मचारी कायम करणे, खासगीकरण, सार्वजनिक उद्योगांची विक्री आणि खासगीकरणास विरोध, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना निश्चित पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या खासगीकरणास विरोध, योजना कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन आणि मान्यता मिळावी, मालकधार्जिन्या कामगार कायद्यातील बदलांना विरोध, संरक्षण व इतर क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवण्यास विरोध आदी बाबत हा संप पुकारण्यात आला आहे.
सातारा येथे सर्व क्षेत्रातील कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपाची तयारी केली आहे. राज्य कर्मचारी, बॅंक, पोस्ट, बीएसएनएल, जिल्हा परिषद व इतर कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर निदर्शने करुन मोर्चाने जिल्हाधिकरी कार्यालयासमोर येणार आहेत. या आंदोलनात आशा वर्कर्स, अंगणवाडी, बांधकाम कामगार व अन्य संघटनांनी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय विमा कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष कॉ. वसंत नलावडे, सिटू चे माणिक अवघडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण, सर्वपक्षीय श्रमिक महासंघाचे शंकर पाटील, कॉ. अस्लम तडसरकर, विजय निकम, प्रकाश घाडगे, आशुतोष गायकवाड, नेताजी दिसले, गणेश देशमुख आदी पदाधिकरी उपस्थित होते.