सातारा – एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकपदासाठी (अधिकारी वर्ग-1) परीक्षा होऊन आठ जणांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. त्याला एक वर्ष पूर्ण होऊनही विभाग नियंत्रकांच्या नियुक्त्या अद्याप झाल्या नसल्याने “एसटीचे काम नि वाट पाहत थांब’ याचा प्रत्यय निवड झालेल्या उमेदवारांना येत आहे.
याबाबत माहिती अशी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक (वर्ग 1) सरळ सेवा भरती अंतर्गत दि. 4 जानेवारी 2019 रोजी लेखी परीक्षा झाली. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व अंतिम निवड यादी तयार करण्यात आली. दि. 6 मार्च 2019 रोजी मूळ कागदपत्रे जमा करून घेण्यात आली.
या यादीत एसटी महामंडळात सध्या कार्यरत असलेले दोन अधिकारी व इतर सहा उमेदवारांची नावे आहेत. मात्र, त्यांची नियुक्ती होत नसल्याने त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. पात्र उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील चार आणि खुल्या प्रवर्गातील चार जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पात्र उमेदवार एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला विचारणा करत आहेत.
मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आहे. त्यामुळे मराठी युवकांच्या अपेक्षा उंचावल्या असून पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शिवसेना नेत्यांनी दिले आहे. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे परिवहन मंत्री असतानाही पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही, याची चर्चा आहे.