मूल्यमापनाची प्रक्रिया माहिती नसल्याने प्राध्यापकांची कोंडी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला “शारीरिक शिक्षण’ विषय अनिवार्य केले आहे. बदलेल्या अभ्यासक्रमाची माहिती प्राध्यापकांना व्हावी, यासाठी विद्यापीठाने अद्याप प्रशिक्षण कार्यशाळा घेतली नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील बदलेल्या अभ्यासक्रमांची माहिती प्राध्यापकांना होण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
विद्यापीठाने यंदापासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शारीरिक शिक्षण विषय बंधनकारक केला असून, तो क्रेडिट सिस्टीम पद्धतीद्वारे शिकवायचा आहे. प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राला दोन; तर द्वितीय सत्राला दोन असे एकूण चार क्रेडिट पॉइंट्स देण्यात आले आहेत. या विषयाची परीक्षा द्वितीय सत्रात घ्यायची आहे. क्रेडिट सिस्टीमसोबतच तो कसा राबवायचा, याबाबत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांमध्ये संभ्रम आहे. विद्यापीठाने केवळ अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाची माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे.
मात्र, प्राध्यापकांची कार्यशाळा घेतलेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांना मूल्यमापनाच्या प्रक्रियेची माहिती नसल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही विद्याशाखेचा अभ्यासक्रम बदलला की, त्याची माहिती प्राध्यापकांना होण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येते. यंदा विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि सायन्स विद्याशाखेतील बदलेल्या अभ्यासक्रमांची माहिती प्राध्यापकांना होण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. राज्यातील इतर विद्यापीठेही अशाप्रकाराची कार्यशाळा घेतात.
दरम्यान, शारीरिक शिक्षण विषय शिकवण्याबाबत प्राध्यापकांमध्ये अजूनही संभ्रम असल्याने विद्यापीठ प्रशासनाने तातडीने शारीरिक शिक्षण संचालक, प्राध्यापकांची प्रशिक्षण कार्यशाळा घ्यावी, अशी मागणी विद्यापीठ शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव डॉ. दीपक शेंडकर यांनी निवेदनाद्वारे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.