पुणे – एकट्याच राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेची 20 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या मित्राविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 45 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी त्यांच्या आईला सप्टेंबरमध्ये बॅंकेत नेले होते. तेथे त्यांच्या नावाने असलेल्या वेगवेगळ्या रकमेच्या 28 लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या गहाण ठेऊन 18 लाख रुपयांचे कर्ज काढले.
तसेच दोघाही आरोपींनी मिळून फिर्यादीचे सोसायटीमधील घर बळकावण्याच्या उद्देशाने त्यांच्या आईशी ओळख वाढवून “आम्हाला घर भाड्याने घ्यावयाचे आहे. त्यासाठी दुरुस्ती करावी लागेल. तुमच्या घरामध्ये आत्मे व भुतांचा वावर असून मुले व तुम्ही लवकर मरणार आहात’ अशी भीती दाखवली. फिर्यादीची आई एकटीच रहात असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी घर बळकावण्याबरोबरच 20 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
फिर्यादी हे परदेशात वास्तव्यास असल्याने त्यांनी पुण्यात आल्यावर तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करत आहेत.