नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांनी स्कुटरवर मागे बसून प्रवास करून नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या अलिकडील लखनऊ दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा केला नव्हता, असे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले.
याच दलातील कमांडो त्यांना सध्या मिळत असलेल्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात येतात. या दलाने म्हटले आहे की, या कॉंग्रेस नेत्याने (प्रियांका) कोणतीही पूर्वकल्पना न देता, अनियोजित दौरा केला. त्यामुळे संरक्षणाची आणि वाहतुकीची पूर्वव्यवस्था करणे शक्य झाले नाही.
त्यांनी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याशिवाय खासगी आणि बुलेटप्रूफ नसलेल्या वाहनातून प्रवास केला. त्यांनी एका दुचाकी चालकाकडून लिफ्ट घेऊन त्याच्या मागे बसून प्रवास केला, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या दुचाकी चालकाकडून हेल्मेट परिधान न केल्याने सहा हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या सर्व सुरक्षाविषयक अडथळ्यांपासून मार्ग काढत त्यांना सुरक्षा व्यावस्था पुरवण्यात आली. मात्र सुरक्षेतील या त्रुटी कमी करून सुरक्षेची योग्य खबरदारी घेत त्यांनी प्रवास करावा असेही पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पोलिसांनी प्रियांका गांधी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. लखनऊमध्ये 28 डिसेंबरला पोलिसांनी प्रियांका गांधी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे.