कामशेत: बौर गावच्या हद्दीतील मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर लेन सोडून चालला असता अचानक बंद पडल्याने मागुन येणाऱ्या बसने कंटेनरला मागुन धडक दिल्याने अपघात झाला या अपघात बस चालकाचा मृत्यू झाला असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बौर गावच्या हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर नं. ७३/९२५ जवळ रविवारी (दि. २२) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चेन्नई कडुन भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ( क्र. एच आर ५५ ए डी ३९२८ ) हा चुकीच्या लेनने चालला होता. त्यात हा कंटेनर रस्त्यात अचानक बंद पडला. यावेळी मागुन येणाऱ्या अक्कलकोट – मुंबई या लक्झरी बस ( क्र. एम एच ०३ सी पी ९९०३ ) ची कंटेनरला मागुन जोरदार धडक बसली. या अपघातात बस चालक रमेश संजय कबाडे (वय २४ रा. म्हाडा, सोलापूर ) याचा मृत्यू झाला असुन बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. कंटेनर चालक मौहमद सइद खान (रा. अब्दुल्ला नगर,शहाबाद, हरियाना) असे कंटेनर चालकाचे नाव आहे.
जखमी क्लिनर वर ( नाव समजले नाही ) सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहे.