नगर – भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांकडून पाथर्डी तालुक्यातील एकाची आठ लाख 32 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. 19) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छिंद्र विक्रम वांढेकर (वय- 30 रा. मोहोज खु ता. पाथर्डी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे.
मच्छिंद्र वांढेकर यांना आरोपींनी शिपाई पदावर नियुक्ती करून देतो म्हणून मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपात ऑर्डर देऊन पगार वेळेवर मिळण्याची हमी दिली. वांढेकर यांच्याकडून सहा लाख रूपये घेतले व पगाराचे दोन लाख 32 हजार रुपये दिले नाही.
वांढेकर यांची एकुण आठ लाख 32 हजाराची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ऑर्डर मिळेल असा वांढेकर यांचा आरोपींनी विश्वास संपादन केला. पगाराची मागणी केली असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वांढेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.