2 कोटी 13 लाखांचा खर्च : मनपाच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार उघड
पुणे – महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2018-19 या वर्षात डुकरे पकडण्यासाठी तब्बल 2 कोटी 13 लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे.
त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे कधी आणि कोठे ही कारवाई केली आणि त्यात किती डुकरे पकडण्यात आली याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा खर्च नक्की झाला का आणि झाला तर किती डुकरे पकडली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगरसेवक नाना भानगिरे यांनी डिसेंबर महिन्याच्या मुख्यसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर प्रशासनाकडून हे खर्चाचे लेखी उत्तर देण्यात आले आहे.
शहरातील डुकराची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला त्यामुळे जून 2018 च्या मुख्यसभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी डुकरांबाबत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सप्टेंबर 2018 मध्ये शहर डुक्कर मुक्त करण्याची घोषणा केली. त्यानंतर शहरात हडपसर परिसरात पालिकेने कारवाई सुरु केली . मात्र, या कारवाईस शहरात डुक्कर मालकांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर पालिकेने आपली ही कारवाई गुंडाळली. तर तब्बल वर्षभरानंतर पालिकेने ऑक्टोबर 2019 मध्ये थेट शहरातील डुकरे बाहेर घेऊन जाण्याचे आदेश डुक्कर मालकांना काढले. त्यानंतर कर्नाटक येथील ठेकेदाराकडून डुक्कर पकडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 2018- 19 या आर्थिक वर्षात पालिकेने तुरळक कारवाई केलेली असताना एवढा खर्च झालाच कसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
58 डुक्कर मालकांची माहिती पोलिसांकडे
महापालिकेकडून शहरातील 58 डुक्कर मालकाची यादी देण्यात आली आहे. पालिकेने कारवाई सुरू केल्यास या मालकाकडून कारवाईत अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन हे पत्र देण्यात आल्याचे प्रशासनाने लेखी उत्तरात नमूद केले आहे.