बेदी, शान-ए-शान यांना वसुंधरा मित्र, तर डॉ. वडगाबाळकर यांना ग्रीन टिचर पुरस्कार
पुणे – पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा वसुंधरा मित्र पुरस्कार दिल्ली येथील फिल्म मेकर विजय बेदी आणि लेह-लडाख येथील स्नोलेपर्डचे संवर्धन करणारे कार्यकर्ते “शान-ए-शान’, तर ग्रीन टिचर पुरस्कार सोलापूर येथील डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना जाहीर झाला आहे. यासंदर्भात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव ही घोषणा केली.
14 वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिनांक 3 ते 5 जानेवारी 2020 दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अर्काइव्ह थिएटर प्रभात रोड येथे होणार आहे. या महोत्सवांतर्गत पर्यावरण क्षेत्रातील जनजाग़ृती संदर्भात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात येते.
यंदाच्या वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी असलेले विजय बेदी हे बेदी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे ख्यातनाम छायाचित्रकार आणि फिल्ममेकर आहेत. बेदी परिवाराला अनेक वर्षांचा वन्यजीव चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि वारसा लाभला आहे. शाश्वत ऊर्जा, वितळणारे हिमनग, सुसर-मगर यांचे प्रश्न, माकडांची तस्करी या विषयांवरील चित्रपट हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या परिषदेत बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, गिरिप्रेमीचे उमेश झिरपे आणि स्क्वेअरचे नयनीश देशपांडे आणि मयुर वैद्य उपस्थित होते.