महामेट्रोचे सादरीकरण : 23 किलोमीटर मार्गासाठी प्राथमिक सर्वेक्षण
पिंपरी – पिंपरी चिंचवड व पुणे शहर मेट्रो मार्गाने जोडले जाणार आहे. त्यासाठी स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम सुरू झाल्यानंतर नाशिकफाटा ते चाकणपर्यंत मेट्रो सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी पुणे महामेट्रो कंपनीला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात सांगण्यात आले होते. महामेट्रोने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानंतर नाशिकफाटा ते चाकणदरम्यान मेट्रोची आवश्यकता नसून त्याठिकाणी निओ मेट्रोचाच पर्याय योग्य असल्याचे म्हटले आहे. या निओ मेट्रोची 120 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून प्रति किमी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पुणे मेट्रोमध्ये पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रो होत असून त्याचे काम सुरू आहे. परंतु, ही मेट्रो निगडीपर्यंत करण्याची मागणी झाल्याने अखेर निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला. सध्या हा डीपीआर राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निगडीपर्यंत मेट्रोच्या बरोबरीने पुणे-नाशिक महामार्गावर देखील नाशिकफाटा ते चाकणपर्यंत मेट्रो सुरू करण्याची मागणी झाली. त्यासाठी या मेट्रोचा डीपीआर करण्याच्या सूचना महामेट्रोला देण्यात आल्या. त्यानुसार महामेट्रोने नाशिकफाटा ते चाकण मेट्रोसाठी सर्वेक्षण केले. त्यामध्ये महामेट्रोने या मार्गावरील वाहतुकीचा अभ्यास करून तुर्तास मेट्रोची आवश्यकता नाही.
मेट्रोसाठी वर्दळीच्या ठिकाणी प्रत्येक तासाला 15 हजार प्रवासी संख्या असणे आवश्यक असते, मात्र सध्या या मार्गावर एवढी प्रवासीसंख्या नाही. तसेच या मार्गावर सध्या प्रचंड वाहतूककोंडी आहे. त्यामुळे या मार्गावर इलक्ट्रिक निओ मेट्रो करणे सोयीचे असल्याचा अहवाल महापालिकेला दिला आहे. त्यानुसार नाशिकफाटा ते चाकणपर्यंत निओ मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नियोजित एचसीएमटीआर (रिंगरोड) मार्गास हा मार्ग जोडला जाणार आहे. नाशिकफाटा ते चाकण मार्गावर इलेक्ट्रीक निओ मेट्रो झाल्यास भोसरी, मोशी, कुरुळी, चाकण या भागातील रहिवाशी, नोकरदार वर्गाला फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.