नागपूर: अरबी समुद्रात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत व कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि विधिमंडळ सदस्य आ. नवाब मलिक यानी आज हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान केला.
नवाब मलिक म्हणाले की, तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयी खुलासा करावा अशी मागणी केली होती. तरी अद्याप खुलासा झालेला नाही. याउलट स्मारकाची कामे थांबवल्याचे चंद्रकांत पाटील सांगतात. प्रत्यक्षात कामे सुरूच झालेली नाहीत. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणारच आणि भाजप सरकारने केलेला भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवाय हा मुद्दा विधिमंडळात लक्षवेधी सूचनेमध्ये मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भातील संपूर्ण माहिती पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन सरकारला दिली होती. वरिष्ठ अभियंते स्मारकासाठीचे वर्क ऑडर देण्यास तयार नव्हते. मात्र, कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वर्क ऑडर देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच याआधी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची माहिती जनतेसमोर आणली होती. मात्र आता कॅगच्या अहवालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होत चाललं आहे, असे मलिक यांनी सांगितले.