नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्मालिया मेट्रोस्थानकाच्या बाहेर सोमवारी पुन्हा निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.
आयआयटी मुंबई, आयआयटी अहमदाबाद, आयआयएससी बंगळुरू, मुंबई विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठात जामियातील पोलिसी कारवाईचा निषेध करण्यात आला. जामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. विद्यापीठाच्या आवारत शिरून विद्यार्थ्यांना बेदम झोडपले.
जामिया मिलिया इस्लामियाच्या व्यवस्थापनाने रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे युध्दासारखे स्वरूपप्राप्त झाले होते, असा आरोप सोमवारी केला. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. दि फेडरडशन ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटीज टीचर असोसिएशननेही या प्रकाराची कार्यरत न्यायधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलेल्या 50 मुलांना सोमवारी पहाटे सोडण्यात आले. 35 जणांना कलकाजी पोलिस ठाण्यातून तर 15 जणांना न्यू फ्रेंडस कॉलनी ठाण्यातून सोडण्यात आले. या आंदोलनात अग्निशामक दल, पोलिस आणि निदर्शक मिळून सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. विद्यापीठाच्या आवारत पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विद्यार्थ्यांनी ग्रंथालय आणि मशिदीतून खेचून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.