घर खरेदी करण्याला वयाचे बंधन नाही. जर आपण सेवानिवृत्त होण्यापूर्वी घर खरेदीचा विचार करत असाल तर आपण आर्थिक ध्येय गाठण्यात फिट आहात, असे समजायला हरकत नाही. घर खरेदी ही आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी मानली जाते. हक्काचे घर असावे असे सर्वांनाच वाटत असते. मात्र आर्थिक अडचणींमुळे घराचे स्वप्न पूर्ण करताना दमछाक होते. परंतु निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना घर खरेदीचे नियोजन केले असेल तर आयुष्याची संध्याकाळ सुखद जाते. आर्थिक रोडमॅप जर एखादा व्यक्ती निवृत्त होण्यापूर्वी घर खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्याने पुढील गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे.
सहा ते नऊ महिन्याच्या खर्चाबरोबरच आपत्कालिन खर्च देखील वेगळा राखणे गरजेचे आहे. याशिवाय स्वत:साठी किंवा पती आणि पत्नीसाठी एक आरोग्य विमा कवच घ्यायला हवा. आदर्श विमा कवच हा दहा ते 12 लाखांत असावा. निवृत्ती निधीसाठी वेगळा पैसा काढून ठेवावा. हा पैसा घर खरेदीसाठी वापरु नये. जर घर खरेदीसाठी आपण गृहकर्जाचा वापर करत असाल तर कमीत कमी कालावधीची निवड करा. याशिवाय गृहककर्जाचे व्याज भरणा करण्यासाठी वार्षिक बोनस, प्रोत्साहन भत्त्याचा वापर करावा.
किरकोळ खर्चासासाठी कर्जाचा वापर करु नये. इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर यासाठी कर्ज काढू नये. उलट मोटार कर्ज, वैयक्तिक कर्ज, गोल्ड लोन असेल तर तातडीने फेडावेत किंवा ते घेऊच नये. दिवसभराच्या खर्चासाठी स्वत:ला आर्थिक शिस्त लावा. हा पैसा भविष्यात उपयुक्त ठरु शकतो. हॉटेलिंग, कपडे खरेदी, पर्यटन यासाठी पैशाचा मर्यादित वापर करा.
आपल्या घरासाठी बजेट निश्चित करा आणि ते बजेट पाळण्याबाबत सजग राहा. निवृत्ती जवळ आल्यावर आपले उत्पन्न निम्मे होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक ताण राहणार नाही यासाठी योजना आखाव्यात आणि त्या अंमलात आणण्याचा विचार करावा. जर आपण निवृत्तीच्या काळात घर खरेदीचा विचार करत असाल तर प्राथमिकतेच्या आधारावर पैशाची जमवाजमव करणे हिताचे ठरेल. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे नवीन कर्ज घेऊ नये आणि अवांतर खर्चांना फाटा द्यावा. घर खरेदीच्या वेळी आकडेवारीला घाबरून न जाता, कायदेशीर शब्दात न अडकता आपले ध्येय साध्य करावे. यासाठी आर्थिक आणि कायदे सल्लागाराची मदत घ्या आणि मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारुन शंकाचे निरसन करा.
– विनायक सरदेसाई