तालुक्‍याचे पाणी पुरवठा अधिकारी कार्यशून्य

सदस्य रमेश देशमुख यांचा सभेत आरोप; हजर करून घेण्याऐवजी बदलीची मागणी

कराड – तालुक्‍याचे पाणी पुरवठा अधिकारी यांचा कारभार शून्य आहे. गेले दीड वर्षे झाले ते तालुक्‍यात कार्यरत आहेत. परंतु त्यांनी एकाही गावाचे समाधान केलेले नाही. त्यांचा जास्तीत-जास्त कालावधी हा रजांमध्ये गेला आहे. मासिक सभामध्ये सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागतात. या कारणावरून ते अनेकवेळा गैरहजर राहतात. अशा कार्यशून्य अधिकाऱ्याला रजेवरून आल्यानंतर कामावर हजर करून घेण्याऐवजी त्यांची बदली करावी. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा वरिष्ठांना द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रमेश देशमुख यांनी केली.

शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार होत्या. तर उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची उपस्थिती होती. पंचायत समितीच्या मासिक सभेत ग्रामपंचायत, कृषी, आरोग्य, बांधकाम, लघुपाटबंधारे अशा विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. याही सभेस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्याप्रसंगी या विभागाचे प्रतिनिधी आढावा देण्यासाठी आले असता सदस्य रमेश देशमुख यांनी त्यांना आढावा देवू नका अशी विनंती केली. या विभागाचा आढावा घेण्यापेक्षा गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी कुटूंबप्रमुख या नात्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत आपण काय निर्णय घेतलात, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर डॉ. पवार यांनी त्यांच्या काम करण्याची पद्धत पूर्णत: चूकीची असल्याचे वेळावेळी कार्यकारी अभियंत्यांच्या कानावर घातल्याचे सांगितले. यावर देशमुख यांनी सभापती, उपसभापती व आपण स्वत: वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता अनेकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यास पंचायत समितीत हजर करून घेऊ नका असा सल्ला दिला. यावेळी अनेकांनी त्यांच्याविषयी तक्रारी मांडल्या.

तालुका कृषी अधिकारी मुल्ला यांनी खरीप हंगाम वगळता कृषी विभागातील यांत्रिकीकरणाबाबत माहिती दिली. यावेळी सदस्यांनी खरीप हंगामाचा आढाव्याबाबत मागणी केली. तसेच कृषी विभागाचे अधिकारी आपले मूळ काम सोडून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी असे जे कोणी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिली.

गटशिक्षणाधिकारी मुजावर यांनी शिक्षण विभागाचा आढावा दिला. गतवर्षी तालुक्‍यातील पाच शाळांची आतंरराष्ट्रीय शाळेसाठी निवड करण्यात आली होती. यावर्षी आणखी शाळांचे प्रस्ताव आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्‍त शाळा अभियान राबविण्यात आले आहे. सध्या शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती देवराज पाटील यांनी तालुक्‍यातील शाळांची गुणवत्तावाढ चांगल्या प्रकारे होत आहे. मात्र गत दोन वर्षात सर्वशिक्षा अभियानातून तालुक्‍यातील एकाही शाळेला पैसे मिळाले नसल्याबाबत नाराजी व्यक्‍त केली. ग्रामपंचायत विभागाच्या आढाव्याप्रसंगी सदस्या सुरेखा पाटील यांनी ग्रामसेवक नक्की काम काय करतात. त्यांना सहा महिन्यात एकदाही फोन उचलायला वेळ मिळत नाही का असा प्रश्‍न उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे या सभेस उपस्थित असल्याने सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांनी पशुसंवर्धन विभाग काम करत नसल्याची तक्रार केली. कोणत्याही योजनेची माहिती सदस्यांना न देता परस्पर निर्णय घेतले जात असल्याचे सदस्यांनी सांगितले. यावरून सभेत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्‍त करत कामात सुधारणा करण्यास सुनावले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×