गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद
– दीपेश सुराणा
पिंपरी – सामान्य मुलांसारखी कार्यक्षमता आणि बुध्यांक नसतानाही केवळ दृढ इच्छाशक्तीच्या बळावर आणि आवाजाच्या देणगीवर विशालनगर-पिंपळेनिलख येथील पृथ्वीराज इंगळे या 15 वर्षीय विशेष मुलाने गायक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सलग चार तास शास्त्रीय गायन, भक्तीगीते, चित्रपट गीते लिलया सादर केल्याने त्याची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. कुटूंबियांनी केलेल्या उपचाराने आणि त्यांच्याकडून मिळालेल्या साथीच्या बळावरच तो गायन क्षेत्रात उंच भरारी घेत आहे.
पृथ्वीराजला अडीच वर्षांचा असतानाच “विल्यम्स सिंड्रोम’ हा आजार असल्याचे वैद्यकिय तपासणीत निष्पन्न झाले. सामान्य मुलांपेक्षा सगळ्या गोष्टी त्याला उशिरा समजू लागल्या. त्याच्यावर ऑक्युपेशनल, स्पीच, बिहेविअरल, प्ले आदी विविध प्रकारच्या थेरपी करण्यात आल्या. पृथ्वीराज सुरवातीला तीन वर्ष रात्री झोपताना रडत असे. त्यावेळी पृथ्वीराजला त्याची आई दया या मोबाईलची रिंगटोन ऐकवित असे. ही रिंगटोन ऐकल्यानंतर तो गप्प बसत. तेव्हाच त्याला संगीताची आवड असल्याचे दया यांना जाणवले. तो साडेतीन वर्षांचा असतानाच त्याला बालकल्याण संस्थेत शिकण्यासाठी त्या घेऊन गेल्या. सात वर्षांचा झाल्यावर त्याने स्वरातून “आ’ हा शब्द उच्चारला. त्यानंतर काही दिवसातच पृथ्वीराज “सारेगम’ गाऊ लागला. एक-दोन भजने म्हणू लागला.
वयाच्या आठव्या वर्षी पृथ्वीराज शास्त्रीय संगीताची पहिली परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. तो सध्या 25 राग गातो. बडा ख्याल गातो. त्याची 200 गाणी तोंडपाठ आहेत. गेल्या 12 वर्षांपासून तो शास्त्रीय संगीत शिकत आहे. त्याने शास्त्रीय संगीतातील तीन परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. आत्तापर्यंत 275 पेक्षा जास्त कार्यक्रमांमध्ये गाणे सादर केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वरसागर संगीत महोत्सवात दोनदा गायनाची संधी मिळाली. आकाशवाणीवर देखील गाणे सादर केले. त्याच्या तीन गाण्यांच्या आल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले आहे. चौथे गीत वैशाली सामंत यांच्यासमवेत रेकॉर्ड केले आहे. 29 ऑक्टोबर 2018 ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे त्याने सलग 4 तास शास्त्रीय गायन, भक्तीगीत व चित्रपट गीते गायिली. त्याची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. तसेच, जिनियस वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासाठी देखील त्याचे नामांकन झाले आहे. जिनियस सिंगर ऑफ-2019 हा बहुमानही त्याला मिळाला आहे. दूरचित्रवाहिनीवरील “सूर नवा, ध्यास नवा’ या गाण्याच्या कार्यक्रमात तो दुसऱ्या फेरीपर्यंत पोहचला होता.
दिग्गजांसमोर केले सादरीकरण
प्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांच्या समवेत शास्त्रीय गायन सादर करण्याच्या संधी त्याला गेल्याच महिन्यात 11 ऑक्टोंबरला पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे मिळाली होती. तसेच, त्याने बाप्पी लहरी यांच्यासोबत देखील गाणे सादर केलेले आहे. आनंदजी, महेश काळे, आशा काळे, रवींद्र महाजनी, दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर आदी दिग्गजांसमोर त्याला गाणे सादर करण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते त्याचा सत्कारही झालेला आहे.
पृथ्वीराजने गायन क्षेत्रात आज मिळविलेले यश पाहिल्यावर मला त्याचा खुप अभिमान वाटतो. “प्रयत्नांती परमेश्वर’ हे खरेच आहे. ईश्वराचा आशिर्वाद आणि आम्ही केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे आम्हाला पृथ्वीराजमधील गायकाला आकार देता आला.
– दया इंगळे, पृथ्वीराजची आई