पुढील सुनावणी 4 जानेवारी 2020 रोजी
नागपूर – 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल खटल्यावर आज नागपूरच्या सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. दरम्यान, सुनावणीसाठी आज कोर्टात हजर राहण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी वकिलांमार्फत कोर्टाला सांगितले. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 4 जानेवारी 2020 रोजी यावर सुनावणी होणार आहे. यावेळी फडणवीसांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ऍड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आली. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी वेळी याचिकाकर्ता ऍड. उके यांनी अधिवेशनाच्या पूर्वीची तारीख मागितली होती. यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. नवनिर्वाचित सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले अधिवेशन होत आहे. फडणवीस हे विरोधी पक्षनेता असल्याने अधिवेशनानंतरची तारीख द्यावी, अशी न्यायालयाला विनंती केली. ही विनंती मान्य करत पुढील सुनावणी 4 जानेवारी 2020 रोजी निश्चित करण्यात आली.