छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
महाबळेश्वर – “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, लेझीम, ढोल-ताशा, हलगीचा निनाद, सगळीकडे लावलेले भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील शाहिरांचे पोवाडे, अशा वातावरणात प्रतापगडावर शिवप्रतापदिनाचा अभुतपूर्व सोहळा मंगळवारी रंगला.
प्रशासनाच्यावतीने साजरा झालेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून मावळे आले होते. यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा अविस्मरणीय क्षण शिवभक्तांनी डोळ्यांमध्ये साठवून ठेवला.
मंगळवारी पहाटे सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात शिवप्रतापदिन सोहळ्याचा शुभारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सपत्नीक भवानी मातेला महाअभिषेक व महाआरती केली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, समीक्षा चंद्राकार, वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर, उपवनसंरक्षक भरतसिंग हड्डा, प्रभारी वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे, सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे, वाडा कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे-पाटील, गटविकास अधिकारी घोलप, निवासी नायब तहसीलदार सोनावणे, प्रदीप सावंत, श्रीकांत तिडके, आनंदा उतेकर, चंद्रकांत उतेकर, विलास मोरे, सुरेश सावंत, भवानीमातेचे पारंपरिक सेवेकरी विजय हवालदार, नरहरी हडप, मंदिर व्यवस्थापक मोहनराव बडवे, विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आई भवानीची मंत्रोच्चाराच्या गजरात व षोडशोपचार पूजा करण्यात आली.
भवानीमाता मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यावर रविकांत मोरे यांनी शिवशाहीचे प्रतीक असलेला भगवा फडकवला. ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून मिरवणुकीला सुरुवात झाली.
शिवकर्तृत्वाचा महिमा सांगणारा जोशपूर्ण पोवाडा शाहीर शरद यादव यांनी सादर केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी, पार व कुंभरोशी, श्री. छ. शिवाजी विद्यालय, कुंभरोशीच्या मुलामुलींनी काठ्यांवर उभे राहून कबड्डीचा खेळ, फुटबॉल या खेळांची प्रात्यक्षिके दाखविली.
अतीत येथील छावा प्रतिष्ठानच्या युवकांनी लाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाड या मर्दानी आणि आगीचे खेळ सादर करून ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. गेली दहा वर्षे सातत्याने शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येते. यावर्षीही ही परंपरा प्रशासनाने जपली. माजी आमदार नितीन शिंदे यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ते व शिवप्रेमींसमवेत भवानीमातेची यथासांग पूजा करून शिवपुतळ्यास अभिवादन केले.