पुणे: ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांची सुन तन्वी शिरीष कुलकर्णी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. “तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी तपासास हजर राहणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडायचा नाही, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करायचा, साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही,’ या अटींवर सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी हा आदेश दिला आहे.
तन्वी यांनी ऍड. श्रीकांत शिवदे आणि ऍड. चिन्मय इनामदार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांना अटक करण्यात आली असून, तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. मागील आठवड्यात डीएसके आणि हेमंती यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. शिरीष यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. पुतणी सई वांजपे आणि अश्विनी देशपांडे यांनी ऍड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला असून, निर्णय होणार आहे.
“तन्वी या डीएसके आणि ब्रदर्स कंपनीच्या नामदारी भागीदार होत्या. डीएसके समुहातील कोणत्याही दैनंदिन व्यवहारात त्यांचा सहभाग नव्हता. यापूर्वी त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. डीएसके, पत्नी हेमंती आणि इतर आरोपींच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात त्यांची कोणतीही भूमिका दिसून येत नाही. केवळ डीएसके यांची सुन असल्याच्या उद्देशाने त्यांना गुंतवलेले आहे. त्या प्रतिष्ठित आहेत. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. तो पूर्णपणे आईवर अवलंबून आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी दुसरे कोणीही नाही. न्यायालयाने दिलेल्या अटी, शर्तींचे पालन करण्यास त्या तयार आहेत. त्यांना जामीन द्यावा,’ अशी मागणी ऍड. शिवदे यांनी केली. दरम्यान, यास विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला होता