इंदापूर- भिगवणदरम्यान जीवघेणा प्रकार
पळसदेव – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते भिगवणदरम्यान मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय करणारे हॉटेल मालक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिक दारू पिऊन रस्त्यावर गाडी चालवत असल्याचे चित्र दिसत आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण यादरम्यान मोठ्या संख्येने वाढले आहेत.
भिगवण ते इंदापूरदरम्यान उजनी धरणातील प्रसिद्ध मासे मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला विना परवाना हॉटेल व्यवसाय थाटले आहेत. या माशाबरोबरच हे हॉटेल मालक नागरिकांना अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. परिणामी यादरम्यानच्या गावातील नागरिक दारू पिऊन तर्रर्र होत आहेत. अनेकदा मुख्य रस्त्यावरच अथवा सेवा रस्त्यावरच पडलेले दिसत आहेत. लोणी देवकर, काळेवाडी, बिजवडी, डाळज, पळसदेव गावाच्या हद्दीत अनेकदा सेवा रस्त्यावर दारू पिऊन नागरिक झोपलेले दिसत आहेत. दारू पिऊन अनेकांनी या रस्त्यावर जीव गमावला आहे. मात्र तरीही हा प्रकार सुरूच आहे.
हॉटेल मालक आर्थिक लाभापोटी अवैधरित्या दारू विकून समाजातील सर्वसामान्य नागरिकांची कुटुंब उद्ध्वस्त करीत आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्वच गावांत स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलीस पाटील नियुक्त आहेत. तरी देखील अवैध दारू विक्री सुरूच आहे.
अवैध कामाची माहिती पोलीस पाटील संबधित पोलीस स्टेशनला देत नाहीत का, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. तरी तातडीने महामार्गालगत असलेल्या हॉटेलवरील दारू विक्री बंद करावी, महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.