सातारा – सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करून तसा उतारा देण्यासाठी साडेतीन हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी काशीळ येथील तलाठ्याच्या सहाय्यकास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. गजानन बाळासाहेब माने (रा. काशीळ) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, काशीळ परिसरातील एका शेतकऱ्याला जमिनीची नोंद घालून तसा सातबारा उतारा पाहिजे होता. तो उतारा देण्यासाठी संशयिताने चार हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी करून कर्मचाऱ्यांनी काशीळ येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी तक्रारदार व संशयित यांच्यात झालेल्या तडजोडीनंतर संशयिताने साडेतीन हजार रुपये स्वीकारले. यावेळी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याला त्याब्यात घेत त्याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, श्रध्दा खरात, श्रध्दा सपकाळ यांनी केली.