सातारा – दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व विविध कलमे न लावण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेताना सापडलेल्या पोलिसाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. रमेश सदाशिव मदने असे शिक्षा झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील एका व्यक्तीवर 2015 मध्ये घरगुती हिंसेचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी व त्याच्यावर इतर कलमे न लावण्यासाठी मदने याने तीन हजाराची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी करून कोरेगाव पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी मदने याला तीन हजाराची लाच स्वीकारतना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नाडगौडा यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी विभागाने दिलेले पुरावे व सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानत न्यायालयाने मदने याला चार वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.