पुणे – दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या जामिनाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला आहे. जागतिक मंदी, लेहमन ब्रदर्स आदी कारणांमुळे आर्थिक संकट आले असल्याचे डी. एस. के यांच्या वतीने सांगण्यात येते. मात्र, हे खोटे आहे. नियोजन फसल्याने डीएसके यांच्यावर आर्थिक संकट आले असल्याचा युक्तिवाद ऍड. चव्हाण यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (दि. 29) दुपारी होणार आहे.
डीएसके, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, सई वांजपे यांच्या नियमित जामिनावर, तर, सून तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनवर सोमवारी सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वी डीएसकेंच्या वतीने ऍड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तिवाद केला आहे. त्यावेळी चव्हाण म्हणाले, डीएसके यांनी 184 कोटी रूपये आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर वळविले, प्रकल्पासाठी बॅंकेकडून कर्ज घेऊन ते पूर्ण न करता इतरत्र पैसे वळविण्यात आले. डीएसके यांनी आर्थिक नियोजन न करता आल्याने कर्ज झाल्याचे ऍड. चव्हाण यांनी न्यायालयात सांगितले. सर्वांच्या जामीन अर्जावर 29 नोव्हेंबरला यावर निर्णय होणार आहे.