जुन्नर तालुका वार्तापत्र : संजोग काळदंते
जुन्नर – शासकीय कार्यालयात शासकीय कामे करण्यासाठी नागरिकांना विलंब होऊ, तसेच या दरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसून कामे झटपट व्हावीत, यासाठी सर्वत्र ऑनलाइन कामांची सेवा सुरू असतानाच सरकारच्या वेगवेगळ्या विभागात मात्र दलालांची चलती सुरू आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असून, त्यांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अडथळे येत आहेत. यामुळेच शासकीय कामांमध्ये दलाली करणाऱ्यांना पायबंद घालावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. जुन्नर तालुक्यात बहुतांश भाग आदिवासी गावांचा आहे, त्यामुळे शासकीय कार्यालयाशी तालुक्यातून येणाऱ्या आदिवासी नागरिकांचा संपर्क अधिक आहे.
अन्न आणि पुरवठा विभागात नवीन रेशनकार्ड काढणे, अथवा दुरुस्त्या करणे, तसेच इतर कागदोपत्री कामांसाठी वेगवेगळे दाखले काढणे, उतारे काढणे, विविध प्रकारच्या नोंदी करुन घेणे, तालुका भूमी अभिलेख कक्षातील नकाशे, मोजणी, तसेच वारसदारांच्या नोंदी, खरेदी नोंदी घालणे अशा प्रकारची महत्त्वाची कामे करण्यासाठी सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात, यामुळे त्यांना हतबल व्हावे लागत आहे. त्यांच्याकडे असलेल्या अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांच्या कामात अडथळे येतात आणि याचाच फायदा या कार्यालयांमध्ये एजंट घेतात.
बरोचवेळा शासकीय कर्मचारी देखील नागरिकांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देतात. तालुक्यातून सर्व स्तरांतील आणि दुर्गम भागांतील नागरिक शासकीय कार्यालयात आपली कामे करण्यासाठी येत असतात. कामे पूर्ण करण्यासानठी अनेकांना सारख्या चकरा माराव्या लागतात. यामुळे नागरिक कार्यालयात येतानाच नाराज असतात. यासाठी कार्यालयांती, संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना सहकार्याची भूमिका दाखवणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण हलपाटे मारावे लागणार नाहीत.