मुंबई : राज्यामधील राजकीय पेच अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. त्यातच आता भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे गटनेतेपदी जयंत पाटील यांची नोंद असणे हा भाजपाला आणि अजित पवार यांना मोठा हादरा समजला जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्रच सोमवारी सचिवालयाकडे दिले आहे. या पत्रानुसार जयंत पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच आता जयंत पाटील यांचाचा व्हीप अधिकृत मानला जाणार आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाध्यक्ष किंवा सरचिटणीस करतात. कोणत्या नेत्याची या पदी निवड झाली आहे याची माहिती 30 दिवसांमध्ये विधावसभा अध्यक्ष किंवा विधानभवन सचिवांना देणे बंधनकारक असते. भाजपाने विधिमंडळ पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचे तर शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र सचिवांकडे दिले आहे. कॉंग्रेसने अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही. मात्र तो कधी निवडावा यासाठी काही कालमर्यादा नसून तो हक्क पक्षाकडे राखीव असतो.
पक्षाने गटनेता निवडल्यानंतर राज्यपाल आणि विधिमंडळ यांना संयुक्तरित्या त्याबद्दल माहिती द्यावी लागेत. या दोन्ही वेगळ्या घटनात्मक संस्था असल्याने वेगवेगळ्या पत्रांद्वारे ही माहिती द्यावी लागते. पक्षाने राज्यापालांना आणि विधिमंडळाला दिलेल्या माहितीची देवणाघेवाण होत नाही. संबंधित प्रकरणामध्ये शनिवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादीचे गटनेता म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा भाजपाला जाहीर करत पाठिंबा पत्रावर सही केली आहे.
असं असलं तरी राष्ट्रवादीने अजित पवार पक्षाचे गटनेते असल्याची माहिती शनिवारपर्यंत अध्यक्षांना कळवली नव्हती. शनिवारीच अजित पवार यांची गटनेतापदावरुन हकालपट्टी करत जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच विधिमंडळ गटनेता म्हणून अजित पवार नाही तर जयंत पाटील यांची नोंद विधिमंडळ सचिवांकडे आहे. असं असलं तरी भाजपाने अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा दावा केला आहे. जयंत पाटील यांच्या नावाने केवळ पत्र देण्यात आले असून त्याची नोंद करण्यात आलेली नाही असं भाजपाने म्हटलं आहे.