पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून गायब झालेला स्वाईन फ्लू पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. हवामान बदलामुळे शहरात डेंग्यु, मलेरिया यासह सर्दी, ताप, खोकला या आजारांचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशी लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले आहे.
मागील 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डेंग्यु, मलेरिया आणि चिकनगुणियाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून स्वाईन फ्लू गायब झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, 8 दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका सुरू झाला आहे.
दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडी असे वातावरण असल्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला आणि घशा खवखवणे अशी लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. शनिवारी (दि.23) दिवसभरात 4 हजार नागरिकांची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 62 संशयीत व्यक्ती आढळून आले असून, त्यांना टॅमीफ्लू देण्यात आले आहे. दरम्यान, 1 जानेवारी ते 23 नोव्हेंबरपर्यंत शहरात 173 रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळून आले. तर 15 हजार संशयीत व्यक्तींना औषधोपचार देण्यात आले आहे.