होंडाने बीआर-व्ही ही आपली पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केल्यानंतर या प्रकारच्या वाहनांची स्पर्धा वाढली आहे. होंडा बीआर-व्ही मध्ये बोल्ड क्रोम ग्रिल उपलब्ध करण्यात आले आहे. साईड पॅनलमध्येही अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 7 आसनी या वाहनातील अंतर्गत बाजू आकर्षक करण्यात आली असून,
मधल्या आणि समोरच्या भागातील प्रवाशांना भरपूर आरामदायक जागा आहेत.
या वाहनासाठी 1.5 लिटर पेट्रोल आणि डिझल इंजिन असून 6 स्पीड मॅन्युल ट्रान्समिशन आहेत. या वाहनांची इंधन कार्यक्षमता सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा होंडा कंपनीने केला आहे. यातील अंतर्गत सजावट सुरुवातीला जागतिक पातळीची करण्यात आली होती. मात्र, नंतर भारतीय ग्राहकांना ध्यानात घेऊन यातील काही बाबी कमी केल्या आहेत. त्यामुळे या गाड्या भारतात अधिक विकल्या जातील असे कंपनीला वाटते. हे वाहन तयार करण्याअगोदर कंपनीने भारतातील ग्राहकांच्या आवडीनिवडीचा तपशिलात अभ्यास केला आहे. गाडीच्या मागच्या बाजूमध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर या गाडीची किंमत अपेक्षेपेक्षा बरीच कमी ठेवण्यात आलेली आहे. गाडी ब्रिवो प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली असल्यामुळे या एसयूव्हीचे बरेच भाग मोबिलो एमपीव्ही सारखे दिसतात. मात्र, समोरची बाजू आणि मागील बाजू वेगळी करण्यात आली आहे. होंडा कंपनीची भारतातील उपस्थिती पाहता या गाडीला भारतीयांकडून सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या गाडीला देखभालीचा खर्च फारसा येत नसल्याचे ग्राहक सांगतात. दीर्घपल्ल्याच्या प्रवासासाठी ही गाडी अधिक उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. गाडीचे इंजिन 1.5 लिटरच्या पेट्रोल आणि डिझल प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहे.