महापौरपदासाठी 13, तर उपमहापौरपदासाठी 11 उमेदवारांचे अर्ज दाखल
नाशिक – राज्यात सत्ता स्थापनेचा पेचानंतर निर्माण होणाऱ्या नवीन समीकरणाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर दिसून येवू लागले आहे. नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणूक नाट्यमय वळणावर पोहोचली आहे.
भाजपच्या बंडखोर नगरसेवकांपैकी कमलेश बोडके यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत येऊन महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात असून नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपुष्टात आली आहे. महापौरपदासाठी 13, तर उपमहापौरपदासाठी 11 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात महापौरपदासाठी भाजपमधून तब्बल 8, तर शिवसेनेकडून 4 आणि कॉंग्रेसकडून 1 उमेदवारांनी अर्ज केला आहे. तसेच उपमहापौर पदासाठी भाजपमधून 7 अर्ज भरण्यात आले आहेत.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आठ नगरसेवकांपैकी कमलेश बोडके यांनी थेट महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या बंडखोर नगरसेविका सुनीता पिंगळे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.
शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी नेते बोडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते. भाजपच्या एकूण तीन नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपला दिलेला हा मोठा धक्का आहे, असे मानले जात आहे.