बिजींग- हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीवादी आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या ठरावामुळे अमेरिका हॉंगकॉंगच्या मुदद्दयावर हस्तक्षेप करत आहे, अशी आगपाखड चीनने केली आहे.
या ठरावामध्ये तथ्य आणि सत्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुहेरी निकषांद्वारे हा ठराव झाला असून हॉंगकॉंगच्या अंतर्गत कारभारामध्ये ही अमेरिकेची ढवळाढवळ आहे, अशी टीका चीनने केली आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतच्या मूलभूत निकषांचे गंभीर उल्लंघन आहे, असेही चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.
हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनाला पाठिंबा देण्याबरोबरच हॉंगकॉंगच्या पोलिसांना युद्धसाहित्य निर्यात करण्यावरील बंदीचा ठरावही अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाला सिनेटबरोबर प्रतिनिधीगृहानेही मंजूरी दिली आहे. या ठरावातील मतभेदांवर तडजोड केल्यावर हॉंगकॉंग मानवी हक्क आणि लोकशाहीवादी हक्कांबाबतचे हे विधेयक अध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
हॉंगकॉंगबाबतचे अनुकूल धोरण अमेरिकेने तातडीने सोडून द्यावे आणि हे विधेयक कायद्यात रुपांतरित होण्यापूर्वीच त्याला रोखावे. आपल्या सार्वभौम विषयामधील हस्तक्षेप चीन कधीही सहन करणार नाही, असेही चीनने म्हटले आहे.