29 कलाकार आपली कला सादर करणार : वेळापत्रक जाहीर
पुणे – आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी दि. 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे होणार आहे. यंदाच्या 67 व्या महोत्सवात तब्बल 29 कलाकार आपली कला सादर करतील. कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यंदा महोत्सवात ओडिसी नृत्यांगना रीला होता यांचे ओडिसी नृत्य होणार आहे. यंदा जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन, मनोज केडिया आणि मोर मुकट केडिया या बंधूंचे सरोद आणि सतार वादन होईल. पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन, अनुजा बोरुडे यांचे पखवाज वादन, स्वित्झलंड केन झुकरमन यांचे सरोदवादन होणार आहे. यासह तेजस उपाध्ये आणि शाकीर खान यांचे व्हायोलिन आणि सतार सहवादन, डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे व्हायोलिन वादन पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
ख्यातनाम गायकांचे गायन
ख्यातनाम गायिका अर्चना कान्हेरे, किराणा घराण्याचे संदीप भट्टाचार्जी, मंजिरी कर्वे-आलेगावकर, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर, पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी, मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित जसराज, ओंकारनाथ हवालदार, रामकृष्ण मठाचे संन्यासी स्वामी कृपाकरानंद, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे – देशपांडे, अतुल खांडेकर, रुचिरा केदार, चंद्रशेखर वझे, पंडित उपेंद्र भट, पंडित अजय चक्रवर्ती यांचे गायन होणार आहे.