टाकळी हाजी-सरदवाडी (जांबूत, ता. शिरूर) येथे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असुन, शेतकरी वर्ग बिबटयाच्या दहशतीमुळे हवालदिल झाला होता.
गेल्या महिन्यापूर्वी सरदवाडी (जांबूत) येथील एका लहान मुलीला बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वन विभागाने या परिसरात सात पिंजरे लावले. दहा दिवसांपूर्वी त्यामध्ये एक बिबट्या सापडला होता. त्यानंतर लगेच दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हा बिबट्या खूप मोठा होता. जाळीत जेरबंद झाल्यानंतर सुटण्यासाठी त्यांनी धडकी देऊन जाळी तोडण्याचा प्रयत्न केला. वनकर्मचाऱ्यानी त्याला माणिकडोह येथे बिबट्या निवारा केंद्रात नेऊन सोडले.
या परिसरात घोड व कुकडी नदीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र व मुबलक पाणी असल्यामुळे जांबूत, वडनेर, टाकळी हाजी, निमगाव दुडे, कवठे येमाई, परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन होते. जांबूत परिसरात तर बिबट्याने ठाणच मांडले असून, यापूर्वी अनेक जणांवर हल्ले झाले. नदीपलीकडे चोंभुत (ता. पारनेर) हद्दीमध्ये गेल्या वर्षी शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून ठार केले होते. तसेच मेंढपाळाच्या कळपावर हल्ले करून शेळ्या मेंढ्या, शेतकऱ्यांची जनावरे, कुत्री फस्त करण्याचे प्रकार रोजच या परिसरामधील गावांत घडत आहेत.
- शेतीसाठी दिवसा वीज द्या
सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून, या कांद्याला व शेत पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे. बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी रात्री घराबाहेर पडणे अवघड झाले असून, कधी बिबट्या हल्ला करीन त्यांचा भरवसा नाही. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी दिवसा वीज द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार गावडे यांनी दिला आहे. - या परिसरात बिबटया पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. ग्रामस्थांना बिबट्या दिसल्यास वन विभाग शिरूर यांच्याशी संपर्क साधावा.
-मनोहर म्हसेकर, वन परीक्षेत्र अधिकारी