मुख्याधिकाऱ्यांकडून मार्केट विभागातील लिपिक शिंदे निलंबित
कोपरगाव – शहरातील कै.बाबुलाल भिलाजी वाणी व जय तुळजाभवानी व्यापारी संकुलातील गाळे, ओटे, कार्यालये यांची विक्री केल्याच्या माहितीसोबत करारनामे, मुद्रांक शुल्क भरुन घेणे, अनामत रक्कम व व्यवहार पूर्ततेसाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती नगरपालिकेच्या खाता नोंद वहित न करता व पालिकेला अंधारात ठेवून मोघम स्वरुपाची व अपूर्ण माहिती भररून गाळ्याच्या व्यवहारात लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार कोपरगाव पालिकेच्या मार्केट विभागात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी प्रथमदर्शनी दोषी आढळून आलेल्या या विभागातील लिपिक सोपान शिंदे यांना आज पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या प्रकरणी उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जणांची चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांनी या दोन्ही संकुलातील गाळयाच्या व्यवहारांची चौकशी करुन त्याचा अहवाल पंधरा दिवसात मुख्याधिकाऱ्यांना सादर करणार आहेत, अशी माहिती उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी दिली.
सोपान शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पालिका प्रशासनाला अंधारात ठेवून शहरातील 17 व्यापारी संकुलातील 650 गाळयांच्या आर्थिक व्यवहारात सुसूत्रता ठेवली नाही. त्यांच्याबद्दल नागरीकांकडून अनेकवेळा तक्रारी आल्यानंतर अखेर मुख्याधिकारी सरोदे यांनी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.त्यांच्याकडून किती लाखाची अपहार झाला आहे.
याची सखोल चौकशी करण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे, कर अधिकारी श्वेता शिंदे, स्थापत्य अभियंता दिगंबर वाघ, सहाय्यक लेखापाल तुषार नालकर, लिपिक राजेश गाढे, लिपिक चंद्रकांत साठे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या दोन व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या व्यवहाराची माहिती नगरपालिका प्रशासनाला शिंदे यांनी 16 जानेवारी 2019 पासून मागविलेली माहिती देण्यास टाळल्याने हा गैरव्यवहार उघडकीस आला. बऱ्याच वेळा शिंदे यांनी माहिती देण्यासाठी मुदतवाढ मागितली.
परंतु त्यांनी माहिती देण्यास अखेर पर्यंत टाळले. दि 8 नोव्हेंबर रोजी या सर्व प्रकरणी शिंदे यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्या नोटीसीची दखल शिंदे यांनी घेतली नाही. त्यानंतर ते विनापरवानगी कार्यालयात 11 नोव्हेंबरपासून भ्रमणध्वनी बंद ठेवून गैरहजर राहुन संपर्क तोडला. त्यामुळे शिंदे यांनी व्यापारी संकुलाच्या गाळ्यात अफरातफर केल्याचा संशय बळावला.
तुळजाभवानी व्यापारी संकुलाच्या 31 गाळ्यांपैकी 10 गाळ्यांचा लिलाव दीड महिन्यापूर्वी मुख्याधिकारी सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. दोन गाळ्यांचा लिलाव करणे बाकी आहे, उर्वरित गाळ्यांच्या व्यवहारात शिंदे यांनी अफरातफर करुन झालेल्या व्यवहाराची रक्कम, करारनामा, अनामत याबाबतची अधिकृत माहिती पालिकेकडे सादर केलेली नाही. ई लिलावात सुद्धा अफरातफर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
तसेच कै.बाबुलाल भिला वाणी (फ्रुट मार्केट) व्यापारी संकुलातील 32 ओटे, 30 गाळे व 20 कार्यालये बांधलेले असून त्यापैकी 20 ओटे, 10 गाळे व 20 कार्यालये शिल्लक आहेत. याही गाळ्यामध्ये लाभार्थ्यांनी जे गाळे ताब्यात घेतले. त्याची कुठलीही अधिकृत माहिती शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सादर केली नाही. या दोन्हीही व्यापारी संकुलातील गाळाधारकांना गेल्या तीन वर्षापासून सोपान शिंदे यांच्या बेजबाबदारपणामुळे कोणतेही भाडे आकारता आलेले नाही. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या सर्व प्रकरणी प्रथमदर्शनी शिंदे यांनी मोठी अफरातफर केल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांना आजपासून निलंबित करण्यात आले असून त्यांनी पंधरा दिवसात पालिकेला व नेमलेल्या समितीला सहकार्य करण्याचे तसेच निलंबन काळात पालिकेच्या परवानगीशिवाय बाहेर न जाण्याचे आदेश मुख्याधिकारी सरोदे यांनी दिली आहे. शिंदे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे नगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान मार्केट विभागाने या संदर्भात नागरिकांना आवाहन केले आहे की यापुढे पालिका कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवहाराची कोणतीही रक्कम देतांना पावती घ्यावी व यापूर्वी सोपान शिंदे यांच्याबरोबर काही व्यवहार केल्यास त्याची माहिती पालिका प्रशासनास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.