डॉ. मेघश्री दळवी
आपल्या पृथ्वीला संरक्षक कवचं अनेक प्रकारची आहेत. गुरूसारख्या मोठ्या ग्रहाची ढाल असल्याने अवकाशातल्या अनेक लहानमोठ्या खडक, अशनी किंवा धूमकेतूंचा रोख बदलून पृथ्वीपासून दूर जातो. काही खडक वा अशनी चंद्रावर आदळतात. तर काही पृथ्वीपर्यंत आलेच तर वातावरणात जळून खाक होतात. तरीही निअर अर्थ ऑब्जेक्टस म्हणजे पृथ्वीच्या जवळ येऊ शकतील किंवा येणार आहेत, अशा अवकाशातल्या वस्तूंचा धोका असतोच. म्हणूनच जगातल्या अनेक वेधशाळा अशा वस्तूंचे सतत निरीक्षण करत असतात.
सुमारे दहा वर्षांनंतर, 13 एप्रिल 2029 रोजी अपोफिस ही अशनी (ऍस्टरॉइड) पृथ्वीच्या अगदी समीप येऊन जाणार आहे. अंदाजे साडेतीनशे मीटर लांबीची ही अशनी पृथ्वीपासून अवघ्या तीस हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. अवकाशाची एकूण व्याप्ती पाहता हे अंतर खूपच कमी आहे. किंबहुना अपोफिस काही कृत्रिम उपग्रहांपेक्षाही आपल्या जास्त जवळ येणार आहे. अशी घटना हजार वर्षांतून एखाद वेळी घडते आणि आपल्याला पृथ्वीवरून हे दर्शन घेण्याचा उत्तम मोका आहे, असे मत रिचर्ड बिंझेल या अवकाश शास्त्रज्ञाने मांडले आहे. अंतर कमी असल्याने आपल्याला कोणतीही दुर्बीण न वापरता केवळ डोळ्यांनी अपोफिस पाहता येईल आणि ही दुर्मिळ संधी घालवू नये, असे ते म्हणतात.
हातात दहा वर्षे असल्याने शास्त्रज्ञ या घटनेसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. अशनीची निर्मिती आणि त्यांची रचना याविषयी अधिक माहिती अपोफिसच्या निरीक्षणातून मिळू शकेल. त्याचा संबंध ऍस्टरॉइड माइनिंग म्हणजे अशनींचा खाणींसारखा वापर करत त्यांच्यामधून मौल्यवान धातू मिळवण्याशी आहे. अलीकडे र्यूचगू आणि बेनू या दोन अशनींवर यान उतरवून त्यांचा अभ्यास झाला आहे. तर आता अपोफिसवर एक लहानसा कंपनमापक (सिस्मोमीटर) उतरवून तिच्या अंतरंगाचा अगदी जवळून अभ्यास होऊ शकतो. सोबत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अपोफिसचा मार्ग बदलू शकेल का, तिचा आकार बदलून ती वेडीवाकडी होईल का, तिचा एखादा तुकडा पडू शकेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचे चमू सज्ज होत आहेत.
अपोफिस अशनी पृथ्वीवर पडणार नाही याची खात्री शास्त्रज्ञ देत असले तरी काही तज्ज्ञांना ही अशनी धोकादायक वाटते आहे. पृथ्वीवरील जीवन कोणकोणत्या कारणांमुळे नष्ट होऊ शकते याचा अभ्यास होत असतो आणि त्यात अशनींचा आघात हे एक कारण बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. डायनोसॉर नामशेष होण्यामागे चीक्सुलुब अशनी होती, तशीच स्थिती माणसांची होऊ शकते यावर अनेक चर्चा झडत असतात. त्यामुळे या दृष्टीने काही शास्त्रज्ञ अपोफिसकडे पाहात आहेत. अपोफिसचा अभ्यास व्हावा पण अगदी काळजीपूर्वक. आपल्या हातून तिचा मार्ग किंचितदेखील बदलू नये याची पुरेपूर खबरदारी आपण घ्यायला हवी, अशा शब्दांत जेम्स बेल या शास्त्रज्ञाने धोक्याचा इशारा दिलेला आहे.