आयुष्मान खुरानाचा “बाला’ लवकरच रिलीज होतो आहे. टक्कलग्रस्त पुरुषांची व्यथा मांडणाऱ्या या सिनेमाचे शिर्षक आपल्याला कसे सुचले, हे आयुष्मानने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले. सिनेमाचे शिर्षक काय असावे, यावर आयुष्मान आणि निर्माते जवळपास 30 दिवस विचार करत होते. त्यांना अगदी छोटे आणि मजेशीर टायटल हवे होते. त्यामधून कथेचे सूतोवाचही व्हायला पाहिजे होते. मात्र असे नेमके टायटल कोणालाच सुचत नव्हते.
एकदिवस आयुष्मानला “बाला’ हे नाव सुचले. हे नाव एखाद्या मुलाचे असल्यासारखा भास होतो, पण त्यातून “बाल’ म्हणजेच “केस’ हा अर्थ लगेच समोर येतो म्हणून त्याने हे शिर्षक लगेच निर्माता दिनेश विजानला कळवले. नाव ऐकल्यावर दिनेशला हसायलाच यायला लागले. त्याला आपले हसू आवरता आवरेना. त्याने हे टायटल अगदी आनंदाने स्वीकारलेही. सिनेमाच्या निर्मितीशी संबंधित अनेकांना हे शिर्षक सांगितल्यावर सगळ्यांची प्रतिक्रिया एकसारखीच होती.
“बाला’ 7 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे आणि त्यामध्ये आयुष्मानसह यामी गौतम आणि भूमी पेडणेकरही असणार आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये टक्कल पडलेला आयुष्मान आपल्या डोक्यावर झारीने पाणी ओततो आहे, असे दिसते. ते बघूनही आपल्याला हसू आवरणार नाही.