पुणे – विधानसभा निवडणुका आणि दिवाळी संपताच मिळकतकर वसुलीसाठी महापालिका सरसावली आहे. करवसुली करणारी बॅन्डपथके सोमवारपासून पुन्हा वाजणार आहेत. त्यासाठी थकबाकीदारांची यादी तयार असून त्यानुसार ही वसुली केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने 31 ऑक्टोबरअखेर सुमारे 940 कोटी रुपयांचा मिळकतकर वसूल केला आहे. मागील वर्षी याच तारखेला सुमारे 866 कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला होता.
मिळकतकर विभागास यावर्षी सुमारे 2,100 कोटींचे करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून करवसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे 940 कोटींच्या कराची वसुली केली असून सुमारे 6 लाख 64 हजार 900 करदात्यांनी कर जमा केलेला आहे.
तर, अजूनही 3 लाख करदात्यांकडे या वर्षीची सुमारे 1,100 कोटींची थकबाकी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे या थकबाकीच्या वसुलीसाठी यावर्षी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून यांसह बॅंन्ड पथकेही नियुक्त केली जाणार आहेत. हे पथक थकबादीदाराच्या दारात वादन करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्या द्वारे महापालिकेस कर वसुलीसाठी फायदा होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यंदाही हा निर्णय घेतला आहे.
11 गावांमुळे उत्पन्नात वाढ
समाविष्ट 11 गावांमुळे पालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नात काहीशी वाढ झाली आहे. 2018 मध्ये 31 ऑक्टोबरअखेर सुमारे 6 लाख 34 हजार मिळकतधारकांनी कर भरलेला होता. तर या वर्षी कर भरणाऱ्या मिळकतधारकांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत 30 हजारांनी वाढली आहे. तर नवीन गावांमधील य वर्षी सुमारे 1 लाख 20 हजार मिळकती वाढल्या असून हा आकडा वाढतच आहे.