550 हून झाडे पडली; क्रॉंक्रिटीकरणाचा बसतोय फटका
पुणे – शहरात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक झाडपडीच्या घटना घडला आहेत. सुमारे 550हून अधिक झाडांनी या पावसाळ्यात मान टाकली आहे. शहरामध्ये वाढते कॉंक्रीटीकरणामुळे हा प्रकार वाढत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाळ्यातील झाडपडीचा हा सर्वाधिक आकडा असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
यावर्षी शहरात पावासाळ्याचा मुक्काम सुमारे 5 महिने होता. या कालावधीत शहरात सुमारे 10 ते 12 वेळा विक्रमी पावसाची नोंद शहरात पूरस्थिती उद्भवली होती. या कालावधीत काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शहरात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.
अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वर्षी शहरात 1 जानेवारी ते 20 ऑक्टोबर 2019 या कालावधीत तब्बल 1 हजार 43 झाडपडीच्या घटना घटल्या आहेत. त्यातील तब्बल 500 हून अधिक घटना या वर्षीच्या पावसाळ्यात घडलेल्या आहेत. या पावसाळ्यात एक ते दोन दिवशी पन्नासहून अधिक कॉल अग्निशमनदलाकडे झाडपडीचे होते. त्यातील एका दिवशी तब्बल 70 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातही यंदा प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डेक्कन परिसरात या वर्षी सर्वाधिक घटना घडल्याचे अग्निशमनदलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले. तर 2017 मध्येही शहरात सुमारे 1201 झाडपडीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्याचे पावसाळ्यातील प्रमाण कमी असल्याचेही ते म्हणाले.
कॉंक्रीटीकरण ठरतेय घातक
शहरात या वर्षी झाडपडीच्या घटनांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या पडलेल्या झाडांचाही समावेश मोठया प्रमाणात आहे. रस्त्यांवर पदपथ करताना तसेच सिमेंटचे रस्ते तयार करताना, झाडांचा विचार केला जात नाही. झाडांच्या खोड कॉंक्रीटीकरणात दाबले जात असून झाडाला पाणी जाण्यासाठीही कोणतीही जागा ठेवली जात नाही. त्यामुळे झांडांचे खोड सडून जात असल्याने तसेच कमकुवत होत असल्याने अचानक आलेला वादळी पाऊस तसेच संततधार पावसाने ही रस्त्याच्याकडेची झाडे तग सोडत असल्याचे चित्र आहे.