माळेगांव – देशात साजरे होणाऱ्या अनेक सणापैकी दिवाळी हा सण मोठा मानला जातो. पाच दिवस साजरे होणार्या उत्सवातील पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो.
हा दिवस पवार कुटुंबीय सगेसोयरे, मित्रपरिवार, कार्यकर्ते यांच्यासाठी देतात. पवार कुटुंबियांना विशेषता: पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज व्यक्ती मित्र, तरुण व वृद्ध येत असतात.
आपल्या लाडक्या नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याबरोबरच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सुवर्णसंधीच यानिमित्ताने उपलब्ध असते. म्हणूनच मागील अनेक वर्षापासून पवार यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक गोविंद बागेत येत असतात. त्या प्रत्येकाला पवारांना भेटण्यासाठी हा खास दिवस असतो. या दिवशी सर्वसामान्यांसह वेगवेगळ्या पक्षातील नेते, कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात. राज्यातून आलेल्या नागरिकांना सकाळी सहा वाजल्यापासूनच पवार व कुटुंबियांना भेटतात.
पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी रांगेत उभे असणाऱ्या नागरिकांसाठी यावेळी ठिकठिकाणी चहा व नाष्टाची सोय असते. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवारप्रेमीही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच या एका दिवसात हजारो कार्यकर्ते व लहान थोरांसह अबालवृध्द गोविंद बागेत येतात व शरद पवारांना भेट देऊन जातात.